तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी 1960साली मराठी विश्वकोशाच्या 20 खंडांचे स्वप्न पाहिले. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ते स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा भक्कम आधार असलेली एक यंत्रणा शास्त्रीबुवांच्या दिमतीला दिली. 1960 ते 2008 हा 48 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी. ह्या कालावधीत विश्वकोशाचे 1 ते 17 खंड (एकूण पृष्ठे 20,182) मुद्रित स्वरूपात प्रकाशित झाले. पहिला खंड 1973 साली तर सतरावा खंड 2007 साली प्रकाशित झाला. ह्या सर्व खंडांची उपयुक्तता, त्यांची जी विक्रमी विक्री महाराष्ट्रात झाली आणि जी लोकप्रियता विश्वकोशाला लाभली त्यावरून निर्विवादपणे सिद्ध झाली. पुढे, प्रती संपल्याने व मागणी सतत असल्याने 2005 साली विश्वकोश मंडळाने खंड 1, खंड 2, व खंड 3 यांचे पुनर्मुद्रण केले. ते तीन खंड आणि
2007 साली प्रकाशित झालेला सतरावा खंड अशा चार खंडांच्या प्रती आज वाचकांना मिळू शकतात. मात्र खंड 4, ते खंड 16 ह्या एकूण 13 खंडांच्या प्रती आज उपलब्ध नाहीत. त्यामुळे एखाद्या वाचकाने विश्वकोशाच्या 1 ते 17 खंडांच्या संपूर्ण संचाची मागणी केली तर 'क्षमस्व, प्रती शिल्लक नाहीत' असं उत्तर नाईलाजाने द्यावं लागतं. अशी संपूर्ण संचाची मागणी आजही वारंवार होत असते आणि तेच नाईलाजाचे उत्तर देण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. शिल्लक नसलेल्या खंडांचे पुनर्मुद्रण हे त्यासाठी लागणारा वेळ व पैसा ह्या दोन्ही निकषांवर पाहता प्रचंड काम आहे. मागील अनुभवावरून सांगायचं तर अशा पुनर्मुद्रणासाठी आणखी काही वर्षे जातील. ही जी काही वर्षे मधल्या काळात जातील तोपर्यंत विश्वकोशाचा संपूर्ण संच वाचकांना कसा मिळेल याविषयी चिंतन करीत असताना सीडी माध्यमाचा पर्याय तपासून पहावा अशी सूचना समोर आली. खंड 1 ते खंड 17 ही एकूण 20,182 पाने आहेत. ती स्कॅन करावी व ईबुक स्वरूपात ती वाचकांना उपलब्ध करता येतील काय हे पहायला काय हरकत आहे, असा विचार करून चाचपणी सुरू केली. हा सीडी माध्यमाचा पर्याय शक्य कोटीतला असून वेळ व खर्च ह्या दोन्ही दृष्टींनी पाहता विश्वकोश मंडळाच्या आटोक्यातील आहे हे लवकरच लक्षात आले. एकीकडे विश्वकोश मंडळाच्या आटोक्यातील असणारा हा पर्याय वाचकांसाठीही अनेक दृष्टींनी अतिशय उपयुक्त आहे असे आढळले. वाचकांसाठीच्या उपयुक्ततेतला सर्वांत महत्वाचा घटक हा किंमतीचा आहे हे लक्षात आले. विश्वकोशाचा प्रत्येक खंड हा सरासरी सुमारे 1200 पानांचा आहे. ह्या 1200 पानांच्या एका मुद्रित खंडाची
विश्वकोश ईबुक आवृत्ती

